वाळू माफियांचा पोलिस अधीक्षक पथकावर हल्ला
एपीआय गणेश मुंडे जखमी
गेवराई (रिपोर्टर) जिल्हा पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व एका पोलीस कर्मचार्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान एसपींच्या पथकावरच थेट असा हल्ला करण्यात आल्यामुळे वाळू माफियांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आज पहाटे पथक प्रमुख गणेश मुंडे व पोलीस कर्मचारी विष्णू वायबसे म्हाळसपिपंळगाव येथील गोदावरी पात्रात जात असताना राक्षसभुवन फाट्यावर सकाळी 6 च्या सुमारास काळ्या रंगाची स्कर्पिओ विनानंबरची थांबलेली होती. सदर गाडी गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. राक्षसभुवन फाट्यावर मुंडे यांनी त्या स्कर्पिओला हात दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीने दिलेल्या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाले आहेत. सदर प्रकरणात अतुल दादासाहेब मस्के रा. पाथरवाला ता. गेवराई व राम मोरे रा. राक्षसभुवन फाटा या दोन आरोपी विरोधात कलम 307, 353, 102, 114, 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गणेश मुंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळू माफियांचा मुजोरपणा मोडीत काढणे आता पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे. तसेच रात्री उशीरा पाडळशिंगी जवळ एक हायवाचा अपघात झाला व तो हायवा कुनाचा?याची चौकशी देखील पोलिस अधिक्षक यांनी करावी तसे वाळू माफिया पथकावर हल्ले कसे करतात? यांचे आत्मपरिषण देखील करण्याची गरज आहे.