अटके दरम्यान एक पिस्टलसह दोन काडतूस जप्त
आंदोलनाला बदनाम करण्याहेतू सरकारचा हा कुठला डाव? -जरांगे
गेवराई/शहागड (रिपोर्टर): अंतरवली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारविरुद्ध आंदोलक यांनी उग्रस्वरुप धारण केले होते. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज बाबत माफी मागत गुन्हे परत घेणार असल्याचे म्हटले होते, मात्र त्यानंतर या प्रकरणात गेवराईचे ऋषीकेश बेदरेसह सनी सिरसट, कैलास सुरवसे यांना अंबड पोलिसांनी काल अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटके दरम्यान बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्टलासह दोन काडतूस जप्त करण्यात आहेत. या अटक सत्रानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारविरुद्ध मनोज जरांगे हे आमने-सामने आल्याचे पहावयास मिळत आहे. या अटकेवरून जरांगे यांनी आमचे लोक अटक करणार नाही, असं आश्वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमचे काही लोक अटक केले आहेत. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. तसेच, पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला होता. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यात मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतांना जालना पोलिसांनी ऋषिकेश बेदरे यांना शुक्रवारी अटक केली आहे. तसेच, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस देखील पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बेदरे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडल्यानंतर राज्यभरात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली होती. अनेक पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सराटे अंतरवलीला भेट दिली होती. पोलिसांच्या लाठीमारात अनेक महिला जखमी झालेल्या होत्या. त्यामुळे अवघा महाराष्ट्र संतप्त होत पोलिसांच्या लाठीमारावर व्यक्त होताना दिसून येत होता. त्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमारबाबत जाहीर माफी मागितली होती. सराटे अंतरवली येथे घडलेल्या घटनेनंतर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्यात येणार, अशी सरकारकडून घोषणाही करण्यात आली होती, मात्र त्या प्रकरणात अटक सत्र अद्यापही सुरू आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या या अटक सत्रावर सरकारचा कोणता तरी डाव असल्याचे म्हटले आहे.
अटक सत्रात सरकारचा कुठला डाव? -जरांगे
आंतरवलीतले कार्यकर्ते अटक करणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करुन आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितलं होतं. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे. सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरीही अटक का केली गेली? मला या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की बोलेन. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.











