Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबोंबला! चोरावर मोर इथे कोण शिरजोर!!, गुटख्याची ट्रक पळविली; पोलिसांनी...

बोंबला! चोरावर मोर इथे कोण शिरजोर!!, गुटख्याची ट्रक पळविली; पोलिसांनी मांजरसुंब्यावर अडवली सहा चोरटे फरार, एक ताब्यात, लाखोंचा गुटखा जप्तनेकनूर (रिपोर्टर) अंबाजोगाईकडून शिरूर कासार मार्गे नगरकडे गुटखा घेऊन निघालेल्या ट्रकला अडवून ती पळवून नेताना मांजरसुंबा या ठिकाणी पोलिसांनी गस्तीच्या दरम्यान पकडल्यानंतर यातील काही जण घटनास्थळावरून पसार झाले तर पळवून नेणार्‍या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरच्या ट्रकमध्ये सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा असल्याचे सांगण्यात येत असून अधिक चौकशीसाठी सदरचा ट्रक हा केज पोलिसात नेण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा गुटखा माफियाराज जिल्ह्यात सुरुच असल्याचे दिसून येते.


याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जाते. बीड जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर याच मार्गे गुटखा मोठ्या प्रमाणावर जातो हे पुन्हा एकदा आजच्या घटनेने दिसून आले. सदरची घटना ही चोरावर मोर होणारी असून रात्री ट्रक क्र. के.ए. 56-0510 क्रमांकाची गाडी गुटखा घेऊन अंबाजोगाई ते शिरूर कासार मार्गे नगरकडे जाणार होती. त्याच दरम्यान अचानक काही अज्ञातांनी सदरची ट्रक अडवली. त्यावर ताबा घेत ती पळवून घेऊन जात असताना मांजरसुंबा या ठिकाणी पोलिसांनी सदरची ट्रक अडवली असता यातील काही जण पळून गेल्याने पोलिसांना संशय आला मात्र अमोल भीमराव कनोजे (रा. विंघनवाडी शिरूर कासार) हा पोलिसांना सापडला. तेव्हा ट्रकमध्ये गुटखा असल्याचे उघडकीस आले. पकडलेल्या ट्रकमध्ये 40 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा गुटखा असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमावत यांना झाल्यानंतर कुमावत यांनी सदरची ट्रक ही केजला मागवली. सध्या गुटख्याने भरलेली ट्रक ही केज पोलिसात असून जेव्हा ट्रक मांजरसुंब्यावर पकडण्यात आली तेव्हा ट्रकमधून सहा जण पसार झाले. सदरची ट्रक ही चोरण्याचा प्रयत्न यातून झाल्याचे उघड होते. ही कारवाई नेकनूरचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय गायकवाड, कर्मचारी दीपक खांडेकर, पोलीस कर्मचारी बाळासाहेब ढाकरे, इसाक शेख यांनी केली.

घटनेवर आणि पोलीस
कारवाईवर अनेक शंका

अवैध पद्धतीच्या गुटख्याची सर्रासपणे तस्करी होते, जिल्ह्यात अख्ख्या ट्रक काही ठिकाणी लुटल्या जातात मात्र गुटखा अवैध असल्याने त्याची कुठे नोंदही नसते. अशा घटना अनेक वेळा अंबाजोगाई-परळी या भागात घडल्याचे बोलले जाते. मात्र रात्री गुटख्याची ट्रक ही चोरटे पळवतात आणि ती ट्रक मांजरसुंबा येथे पोलीस अडवतात. ज्या प्रकरणात हाक ना बोंब होते त्या प्रकरणात कारवाई झाली कशी? म्हणजे गुटखा अवैध आहे तो चोरीला गेल्याची माहिती गुटख्याचा मालक पोलिसांना देऊ शकत नाही, समजा रात्री या ट्रकची माहिती पोलिसांना दिली गेली असेल तर मग पोलिसांच्या संगनमताने गुटख्याची तस्करी होते, असे एक ना अनेक प्रश्‍न यात उपस्थित होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!