बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा, साईराम या मल्टिस्टेटने ठेवीदारांचे पैसे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे तर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अन्याय होत असल्याने एका कुटुंबाचे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.

पेन्शन, वेनासाठी कुटुंबियांचे आमरण उपोषण
ज्ञानराधा, साईराम मल्टिस्टेट या दोन्ही बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले असून त्यांचे पैसे तात्काळ देण्यात यावे, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी राजेंद्र मोटे, श्रीराम बादाडे, वर्षा जगदाळे, करण लोंढे, श्रीकृष्ण गायके यांच्यासह आदींची उपस्थिती आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात पठाण रियाज खान शौकत खान हे आपल्या कुटुंबियांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. न्यायालयाने आदेश देऊनही अनुकंपा धरतीवर सेवेत सामावून घेतले जात नसल्याने हे आंदोलन सुरू आहे. तसेच माजलगाव येथील सफाई कामगारांचे थकित वेतन मिळत नसल्याने या वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या वेळी रंगनाथ बोराडे, लंकाबाई शिंदे, रमेश पंडित,छायाबाई बोारडे, अनिता डोळस, सागरबाई पंडित, गौळण घडसे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पारनेरमध्ये मंजूर असलेले समाज मंदिर बांधकाम जुन्या चावडीच्या जागेत करण्यात यावे या मागणीसाठी पारनेर येथील नागरीकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. हे उपोषण बहुजन विकास परिषदेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच सय्यद युसुफ यांचेही बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. सेवानिवृत्ती होऊनही त्यांना पेन्शनची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. बीड न.प.ने त्यांची पेन्शनची रक्कम द्यावी, अशी मागणी सय्यद युसुफ यांची आहे.











