Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपाटोद्यात दरोडेखोरांचा देवाच्या मळ्यात हैदोस,नाईकनवरे कुटुंबाला प्रचंड मारहाण; चार गंभीर जखमी, वृद्धेस...

पाटोद्यात दरोडेखोरांचा देवाच्या मळ्यात हैदोस,नाईकनवरे कुटुंबाला प्रचंड मारहाण; चार गंभीर जखमी, वृद्धेस फरफटत नेत मकात टाकले

, महिलांच्या अंगावरील दागिने लुटले, रोख रक्कमही लुटली, अन्य एका ठिकाणी शहरात दरोडा, मांजरे कुटुंबाचीही मोठी लूट, शहरात प्रचंड भीतीचे वातावरण, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी
पाटोदा (रिपोर्टर) सात ते दहा दरोडेखोरांनी पाटोदा शहरात लाठ्या-काठ्या, गजांनी मारहाण करत दहशत माजवून लुटालूट केल्याची घटना रात्री घडली.  शेतकरी तुकाराम नाईकनवरेंच्या देवाच्या मळ्यात असलेल्या घरावर हल्ला चढवून घरातील सदस्यांना मारहाण करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड पळवून नेली. मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे नावाच्या व्यक्तीच्या घरीही असाच धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मोठा ऐवज लुटल्याचे सांगण्यात येते. नाईकनवरे यांच्या घरी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. 13 वर्षाच्या चक्रपाणी नावाच्या मुलाने दरोडेखोरांना काय न्यायचे तर न्या, परंतु मारहाण करू नका, असे म्हटल्यानंतर तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी घरात कोंडून सोडून दिले. प्रतिकार करणार्‍या गणेश नाईकनवरेला मात्र प्रचंड मारहाण केल्याने उपचारासाठी चौघांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी डीवायएसपी यांनी भेट दिली. या घटनेने पाटोदा शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


   रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास सात ते दहा दरोडेखोरांनी मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे यांच्या निवासस्थानी दरोडा टाकून त्या ठिकाणाहून नगदी रोकडसह ऐवज चोरून नेला. त्यानंतर या दरोडेखोरांनी आपला मोर्चा पाटोदा शहरातील काळा हनुमान ठाणा परिसरात असलेल्या देवाचा मळा या शेतातील तुकाराम नाईकनवरे यांच्या घराकडे वळविला. चोरट्यांनी अगोदर बाहेरचे दार बळजबरीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजा वाजवला. तुकाराम यांची सून गिता हिने दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी तिच्या डोक्यात काठीने जबर वार केला. याच वेळी गिता यांचा नवरा गणेश नाईकनवरे उठला आणि दरोडेखोरांचा प्रतिकार करू लागला, त्या वेळी दरोडेखोरांनी गणेशला प्रचंड मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातला गोंधळ ऐकून तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या उठल्या. त्यांच्या गळ्यातील, हातातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून नेत त्यांनाही मारहाण केली. लक्ष्मीबाईला घरातून फरफटत नेत शेतातील मकाच्या शेतात फेकून दिले. त्यावेली तुकाराम यांचा 13 वर्षीय नातू चक्रपाणी याने दरोडेखोरांना ‘मारहाण करू नका, काय घेऊन जायचे ते जा’, असे म्हटल्यानंतर तुकाराम आणि लक्ष्मीबाईंना त्यांनी एका खोलीत कोंडून टाकले. दरोडेखोरांचा हा धुमाकूळ तब्बल एक तास सुरू होता. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लक्ष्मी तुकाराम नाईकनवरे, ओंकार गणेश नाईकनवरे, गणेश तुकाराम नाईकनवरे, गिता गणेश नाईकनवरे यांचा समावेश आहे. त्यांना बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने आणि 70 कट्टे विकलेल्या तुरीची काल पट्टी आली होती. ती रोख रक्कम लुबाडून दरोडेखोर पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी एपीआय कोळेकर, पीएसआय पठाण यांनी तात्काळ भेट दिली. या भागाचे डीवायएसपी धाराशीवकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून शहरात या दरोड्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!