पंकजांनी दिल्या ‘महायुतीचा विजय असो’ च्या घोषणा
बीड (रिपोर्टर): भाजपाच्या राष्ट्रीय सचीव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज शहरातील जालना रोड भागात भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी पंकजा मुंडे यांनी ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. कार्यालयाबाहेर एक भव्य बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर ‘बीड जिल्ह्याचा विकास हाच आमचा विश्वास’ हा मथळा ठळकपणे लिहला गेला आहे. त्याच बॅनरवर शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायकराव मेटे यांचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले असून सदरचे बॅनर हे जिल्हाभरात लावण्यात आलेले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार दौर्यावर असलेल्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज भाजपाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सदरचे कार्यालय हे बीडच्या जालना रोड भागात उघडण्यात आले असून कार्यालयाबाहेर मोठे कटआऊट लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवर प्रामुख्याने ‘बीड जिल्ह्याचा विकास हाच आमचा विश्वास’ हे ठळकपणे लिहले गेले असून त्याच बॅनरवर स्व. गोपीनाथराव मुंडे, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायकराव मेटे यांचा फोटोही छापण्यात आला आहे. कालपर्यंत स्व. मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे या शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारीबाबत चर्चेत होत्या. काल बजरंग सोनवणे यांना पवार गटाकडून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना जे बॅनर लावले त्यावर दिवंगत विनायक मेटे यांचा फोटो छापल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. सदरचे बॅनर हे जिल्हाभरात लावण्यात आल्याचेही सांगण्यात येते.
मी विचाराची निवडणूक लढतेय, जातीपातीचे राजकारण करत नाही -पंकजा मुंडे
भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, महाविकास आघाडीचा प्रचार सुरू होऊ अथवा नाही तो आमचा विषय नाही. आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून कामाला लागलो आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार काल घोषीत झाला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विकासाची कामे कोणी केली आहेत हे जनतेला माहित आहे. निवडणुकीमध्ये लाटेचा विषय नसतो, इथे काम करणार्यालाच जनता लाईक करत असते. मी विचाराची निवडणूक लढतेय, जातीपातीचे राजकारण मी कधीही करत नसल्याचे पंकजांनी म्हटले.