बीड (रिपोर्टर): बीडवरून म्हाळसजवळ्याकडे निघालेल्या शिंदे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली खांडे यांच्यावर खंडेश्वरीजवळ गेल्या तीन दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी हल्ला चढवून प्रचंड मारहाण केली होती. सदरच्या घटनेत रात्री माऊली खांडे यांच्या फिर्यादीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाऊ हरिभाऊ खांडे, भाच्चा गोरख ऊर्फ पप्पू शिंदे यांच्यासह बारा जणांविरोधात कलम 307 सह अन्य कलमांतर्गत बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली रामेश्वर खांडे यांनी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2022-23 साली आपण ग्रामपंचायतीमध्ये पॅनल टाकला तेव्हापासून कुंडलिक खांडे, त्याचा भाऊ गणेश खांडे हे आपल्यावर सातत्याने दबाव टाकत आहेत. हस्ते-परहस्ते हातपाय तोडून टाकण्याची धमकी देत आहेत. याबाबत पिंपळनेर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधिक्षकांना आपण निवेदन दिलेले आहे. पुढे आपल्याला शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद मिळाले, तेव्हाही मला कुंडलिक खांडे यांच्या मामाचा मुलगा गोरख ऊर्फ पप्पू शिंदे याने फोन करून धमकी दिली होती, त्याची तक्रार मी पिंपळनेर पोलिसात केली होती. 3 एप्रिल रोजी मी व माझे दोन मित्र स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच. 12 ई.टी. 2234 मध्ये बसून जवळ्याकडे जात असताना एक पांढर्या रंगाची टाटा व्हिस्टा त्या ठिकाणी आली आणि आमच्या गाडीला आडवी लावून त्यातील तरुणांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कुंडलिक बापू अॅडमिट आहेत, त्यांचे दोन भाऊ बाहेर गावी आहेत, त्यांचे नाव तू घेऊ शकत नाही, असे म्हणत लोखंडी सळईसह धारदार शस्त्राने माझ्या हातावर व पायावर मारहाण केल्याचे माऊली खांडे यांनी तक्रारीत म्हटले. त्यावरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात शिंदे शिवसेना गटाचे कुंडलिक खांडे, गणेश खांडे, नामदेव हरीभाऊ खांडे, गोरख शिंदे, बाबा रतन पाटोळे, सुनील पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात कलम 307, 326, 324, 341, 120-बी 143, 147, 148, 149, 504, 506 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.