भाजपाच्या मिशनला भाजपा आमदार कुटुंबियांची खिळ
बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर): आरक्षणासह अन्य मुद्यांवर जिल्ह्यात भाजपा विरोधात प्रचंड असंतोष एकीकडे पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय सचीव तथा लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे या असंतोषातून संतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदारसंघात मुंदडा कुटुंबियांच्या कार्यपद्धतीमुळे तेथील मतदारांच्या असंतोषाला पंकजा मुंडेंसह खा. प्रितम मुंडे यांना तोंड द्यावे लागत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. प्रचार दौर्या दरम्यान पंकजा मुंडेंना कुठे काळे झेंडे दाखविले जातात तर कुठे विद्यमान खासदार प्रितम मुंडेंना लोकांच्या ‘चले जाव’च्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व घडामोडी केवळ आणि केवळ केज मतदारसंघातच दिसून येत असून आमदार म्हणून अधिराज्य गाजवणारं मुंदडा कुटुंबीय या मतदारसंघात मतदारांना कस्पटाप्रमाणे वागणूक देत असल्यानेच सर्वसामान्यांचा रोष आता थेट पंकजा मुंडेंपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत जात असल्याचे बोलले जात आहे.
केज विधानसभा मतदारसंघाचा निवडून आलेला आमदार एक असतो मात्र आमदारकीचा कारभार तीन-तीन लोक सांभाळताना दिसून येतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा मतदारसंघ मुंदडा कुुटुंबीयांसाठी सत्ताकेंद्र बनलेला आहे. त्यामुळे पत्नी वा सून आमदार आहे म्हणून मुंदडा कुटुंबीयातले स्वत: आमदार असल्यागत मतदारसंघात वर्तन करतात. त्या वर्तनामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय सचीव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडेंना फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार पतीसह अन्य एका काम करणार्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातून केवळ उद्घाटनाला बोलवलं नाही म्हणून आमदार पतीने त्याला काम करू दिले नव्हते. त्यावेळीही मुंदडा कुटुंब वादग्रस्त झालं होतं. गेल्याकाही दिवसांपूर्वीच आ. मुंदडा यांचे सासरे आणि आरक्षण आंदोलकांचे चांगलेच वाजले होते. मुंदडा यांचे पती आणि सासरे हे सर्रासपणे आमदारकीचा रुबाब गाजवतात, तेच त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांना आवडत नसल्याचे आता मुंडे भगिनींना सामोरे जावे लागत असलेल्या रोषातून दिसून येत आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी चारसौ पार साठी एक एक जागेवरील एका-एका मतासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा करत आहेत मात्र त्याच भारतीय जनता पार्टीच्या आश्वासक भूमिकेला केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्यांचे कुटुंबिय हरताळ लावत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बीड जिल्ह्यात कुठेही पंकजा मुंडे यांना जाहीर रोषाला सामोरे जावे लागले नाही. मात्र गेल्या 20 दिवसांच्या कालखंडात केज मतदारसंघात भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आणि विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना गावागावात ज्या रोषाला सामोरे जावे लागले तो रोष भाजपा आमदार कुटुंबियातील सदस्यांच्या कार्यप्रणालीचा तर नव्हे? मुंदडांच्या कार्यपद्धतीचा फटका पंकजा मुंडेंना बसणार असे जाहीरपणे मतदारसंघातील नागरीकांतून बोलले जात आहे.