
शंभर कि.मी.च्या प्रवासात शंभर सीसीटीव्ही तपासले
आष्टी पोलीस ठाण्याचे भुतेकर यांनी चोरटा पकडला
आष्टी (रिपोर्टर): सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांनी संपूर्ण जिल्हा हादरला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या चोर्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तब्बल 47 तोळे सोने चोरीला गेलेल्या या थरारक घटनांचा उलगडा अखेर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कासारी गावातील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय 25) या युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत घरफोडी प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराला पकडण्यात यश मिळवले आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या होत्या. चौकशीत या घरफोड्यांमागे आष्टी तालुक्यातील कासारी येथील भोसले टोळी असल्याचे स्पष्ट झाले. सांगली पोलिसांनी तब्बल 100 किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींची ओळख पटवली. यानंतर त्यांच्या दुचाकीवरील क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा माग घेतला. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसर्या आरोपी मोहन भोसलेने चौकशीत कबुली दिल्याने सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ बीडकडे रवाना झाले. मंगळवारी उशिरा रात्री सांगली पोलिसांनी आष्टी पोलिसांची मदत घेत कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकला. ही कारवाई अत्यंत गोपनीयपणे पार पडली. संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले हा आरोपी आपल्या घरात असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या अटकेनंतर पोलिसांवरील वाढलेला दबाव काहीसा कमी झाला असला तरी, या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलिसांनी हाती घेतला असून लवकरच त्यालाही पकडले जाईल, असा विश्वास सांगली पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तीन घरफोड्यांमध्ये आरोपींनी तब्बल 47 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.दिवसाढवळ्या झालेल्या या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घरात दिवसाढवळ्या सुरक्षित नाही का? असा सवाल नागरिक विचारत असताना, या आंतरजिल्हा टोळीच्या अटकेमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संपूर्ण कारवाईत आष्टी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद, तसेच सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलिसांनी सांगितले की, फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा पूर्ण उलगडा लवकरच करण्यात येईल.








