बीड (रिपोर्टर) जीएसटीचा टॅक्स न भरता कारखान्यातून उत्पादीत केलेली साखर विक्री केल्याची माहिती जीएसटी विभागाला झाल्यानंतर आज औरंगाबादच्या जीएसटी विभाग उपायुक्तांनी परळीतील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यकीय सहकारी साखर कारखान्यावर छापा मारला. सुरुवातीला उपस्थित कर्मचार्यांसह एमडी यांनी जीएसटी अधिकार्यांना सहकार्य केलं नसल्यामुळे अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात कारखान्यामधील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याकडे सन 2020-2021 आणि 2021-22 या दोन वर्षाचा जीएसटी टॅक्स थकित आहे. सदरचा टॅक्स भरण्यात यावा यासाठी जीएसटी विभागाने संबंधित कारखान्याला वेळोवेळी पत्र दिले होते. मात्री जीएसटी टॅक्स भरण्यात आला नव्हता. कारखान्याने जोपर्यंत जीएसटी टॅक्स भरणार नाहीत तोपर्यंत कारखान्याने उत्पादीत केलेली साखर विक्री केली जाणार नाही, असे जीएसटी विभागाला कळविले होते. मात्र जीएसटी न भरता कारखान्याने साखर विकली. याची माहिती जीएसटी विभागाला झाल्यानंतर औरंगाबादचे विभागीय उपायुक्त चंद्रकांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रवीण मुंडे, अधिक्षक भीमराव नाडे यांच्या 10 लोकांच्या पथकाने आज सकाळी 10 वाजता वैद्यनाथ कारखान्यावर छापा मारला. सकाळच्या दरम्यान पथकाला कारखान्यातील कर्मचार्यांसह एमडींनी चौकशीला सहकार्य केलं नसल्याचे सुत्रांचे सांगणे आहे त्यामुळे जीएसटी विभागाच्या अधिकार्यांनी थेट दिल्लीस्थित वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना याबाबत कळविले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जीएसटी विभागाला पोलिसांकडून संरक्षण मिळालं. वैद्यनाथ कारखान्यावर पोलीस बंदोबस्तात जीएसटी विभागाचे अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या छाप्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.