Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeदेश विदेश’देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही’ काँग्रेस महासचिव प्रियांका यांचा हल्लाबोल

’देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही’ काँग्रेस महासचिव प्रियांका यांचा हल्लाबोल


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त दाव्यावर प्रश्‍नचिन्ह उभं करत आगपाखड केलीय. ’करोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही’ असा दावा मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला होता. यावरून प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.


’मृत्यू यामुळे झाले, कारण महामारीच्या वर्षात सरकारनं ऑक्सिजन निर्यात 700 टक्क्यांपर्यंत वाढवला. सरकारनं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणार्‍या टँकरची व्यवस्था केली नाही. मृत्यू यामुळे झाले कारण, एम्पावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीचा सल्ला कानामागे टाकून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही तयारी केली नाही. रुग्णालयांत ऑक्सिजन प्लान्ट लावण्यासाठी कोणतीही सक्रियता दाखवली नाही’ असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलंय.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात किती रुग्णांनी प्राण गमावले? असा प्रश्‍न मंगळवारी राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला होता. यावर, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालांचा हवाला देत आरोग्य मंत्रालयानं करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्यसभेत मंगळवारी केला होता. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केला. आरोग्य हा राज्याचा विषय असून करोनामुळे होणार्‍या मृत्यूंची माहिती राज्यांकडून दिली जाते. पण त्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलेलं नाही, असं डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं गेलंय. उल्लेखनीय म्हणजे, एप्रिल आणि मे महिन्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या या उत्तरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!