Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedआधारवडाच्या पारूंब्याला तुम्ही बळ दिले! कायम ॠणात राहू!!

आधारवडाच्या पारूंब्याला तुम्ही बळ दिले! कायम ॠणात राहू!!


१७ सप्टेंबरची ती सकाळ आजही आठवते. अब्बांचे पाय सुजल्याने त्यांना बीडच्या रूग्णालयामध्ये डॉक्टरांना दाखवण्यासाठी नेले. डॉक्टरांनी ऍडमीट होण्याचा सल्ला देत दोन दिवसात बरे होण्याचे आश्‍वासन दिले. आम्ही डॉक्टरांच्या त्या आशावादावर समाधानी होत अब्बांवर उपचार सुरू केले. मात्र वेगवेगळ्या चाचण्यांसाठी सर्व सुविधायुक्त रूग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला काही जवळच्यांनी दिल्यानंतर आम्ही अब्बांना औरंगाबाद येथील रूग्णालयामध्ये २३ सप्टेंबरला दाखल केले. उभे आयुष्य ज्या माणसाने काबाडकष्ट केले, घामाचे रक्त ओकले अशा कष्टाळु आणि मेहनती माणसाला काही होत नसतं असं प्रत्येकांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं आणि ते ही खरं. अब्बाचे वय जरी पंच्याहत्तरीचे असले तरी ते आजही तरूणाला लाजवेल अशा स्थितीमध्ये रहायचे काम करायचे. तिसर्‍या मजल्यावरच्या साठ पायर्‍या रोज तीन ते चार वेळा चढायचे आणि उतरायचे. केवढा तो स्टॅमिना, त्यामुळे आम्ही निश्‍चिंत होतो. आज ना उद्या अब्बा घरी येणार हा विश्‍वास कायम मनात होता. मात्र दिवसामागुन दिवस जात होते.

17dec pan8888

आठवडा उलटला, दोन आठवडे उलटले, महिना उलटला, दीड महिना झाला तरी अब्बाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. बरोबर दोन महिने झाले अन् १७ नोव्हेंबरचा दिवस उजडला, सकाळी अब्बांची प्रकृती प्रचंड खालावली. ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास अब्बांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी जेंव्हा आम्हाला हे सांगितले तेंव्हा आमच्या डोक्यावर अक्षरश: डोंगर कोसळला. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले, ज्या अब्बांनी बोटाला धरून चालायला शिकवले, बोलायला शिकवले, ज्यांच्या कष्टामुळे पोटाला दोन घास मिळाले, ज्यांच्या भविष्याच्या भेदकदृष्टीमुळे शिक्षण घेता आले, ज्यांच्यामुळे चांगल्या संस्कारात वाढता आले ते काही क्षणात आपल्यातून जातीलच कसे? असे एक ना अनेक प्रश्‍न समोर उपस्थित होत असतांना अब्बा आपल्यात नाहीत. आता आपले कोणीच नाही. हा विचार मनात येत असतांना गेल्या ४०-४५ वर्षाच्या कालखंडातल्या अनेक आठवणी डोक्यात घोंगावत होत्या. १७ सप्टेंबरला घरातून बाहेर आलो आणि दोन महिन्यानंतर १७ च तारखेला म्हणजे नोव्हेंबर महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. हे आजही विश्‍वास न बसणारी घटना. आज एक महिन्यानंतर अविश्‍वनीयच. आजही अब्बा रिपोर्टर भवनात असल्याचा आम्हाला विश्‍वास आहे. अब्बांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी अक्षरश: हजारोंचा जनसमुुदाय त्यांना अखेरचा खांदा देत होते. त्याचवेळी अब्बांची वैचारिक आणि संस्कारशील शिदोरी आमच्या झोळीत पडली. अब्बा नाहीत हे आमच्या मनाला पटत नाही. आमचे पितृछत्र हरवले हेही खरं. परंतू त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांची अल्लाहबद्दलची भक्ती, दीनदुबळ्यांबाबत त्यांची असलेली सहानुभूती, त्यांच्या प्रत्येक विचाराचे आचरण आम्ही करणार. १७ नोव्हेंबर ते आज १७ डिसेंबर हा एक महिन्याचा कार्यकाळ अब्बाविना घालवणे किती कठीण हे आम्हालाच माहिती. मात्र अशा परिस्थितीत सर्वक्षेत्रातले लोक आमचे सांत्वन करण्यासाठी येत होते. अनेकांना प्रश्‍न पडायचा अब्बा तर तब्येतीने ठिक होते, रोज रिपोर्टर भवनाच्या दारात अथवा गॅलरीत बसलेले असायचे. अचानक असे काय झाले? या प्रश्‍नाचे उत्तर आम्हालाही शोधता आले नाही. लोक येत होते, सांत्वन करत होते, आमचा आधारवड कोसळला होता. त्या वडाच्या आम्ही नुसत्या पारंब्या होतो. त्या पारूंब्या जोपर्यंत जमिनीशी एकरूप होत नाहीत तोपर्यंत त्यांचं मुळ होत नाही. त्या पारूंब्याचे मुळ करण्यासाठी एक महिन्याच्या कालखंडात अनेक मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकिल, व्यापारी, पत्रकार, संपादक, अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य आप्तस्वकिय, नातेवाईक, मित्र परिवार आम्हाला दु:खातून सावरण्यासाठी गेल्या महिनाभरात येत होता. सुखात प्रत्येकजण येतो मात्र दु:खात आधार देणारा आपला असतो. आमच्याकड आलेल्या प्रत्येकाचे प्रत्यक्षात ॠण व्यक्त करता आले नाही. आज सर्वांचे आम्ही ॠण व्यक्त करतो.
-आपला शेख तय्यब सिकंदर, शेख मुबीन सिकंदर

Most Popular

error: Content is protected !!