बीड, (रिपोर्टर)ः- नांगरी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे मुंदडा नागरी व्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी प्रथमच येत असल्याने आज पर्यंत नागरी व्यवस्थेचे नेतृत्व करणारे पापा मोदी त्यांच्या सोबत कशी कुस्ती खेळतात या बाबत अवघ्या जिल्ह्याचे लक्ष अंबाजोगाई नगर पालिका निवडणुकीने आत्तापासून वेधून घेतले आहे. नंदकिशोर मुंदडा यांनी काल अत्यंत साध्या पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून पापा मोदी आज किंवा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. इथे पक्षीय राजकारणापेक्षा मोदी विरूध्द मुंदडा ही चुरशीची लढत पहायला भेटणार आहे.
अंबाजोगाईच्या राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षापासून मुंदडा कुटूंब ग्रामीण भागात नेतृत्व करत आलं आहे तर शहरी भागात राजकिशोर मोदी उर्फ पापा मोदी हे नेतृत्व करत आहेत. यावर्षी प्रथमच मुंदडा कुटूंबियांनी शहराच्या राजकारणात थेट लक्ष घातल्याचे दिसून येते. दसतुरखूद नंदकिशोर मुंदडा हे उमेदवार म्हणून समोर आले असून काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबाजोगाईच्या राजकारणात मोदी विरूध्द मुंदडा यांचं राजकारण अनेक निवडणूकांमध्ये पाहितलं गेलं असलं तरी समोरा समोर प्रथमच हे दोघे निवडणूक लढवत आहेत. राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहर आपल्याच ताब्यात रहावं यासाठी आघाडीची मोट बांधत असल्याचे सांगितले जाते. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेणार आहेत तर इकडे नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई शहरावर भाजपाचे अधिराज्य व्हावे यासाठी प्रयत्नशिल असून दोघेही तेवढयाच ताकदीने निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अंबाजोगाईत मुंदडा विरूध्द मोदी ही कुस्ती अधिक रोमहार्षक पध्दतीने पहायला मिळणार आहे.














