परळी (रिपोर्टर): परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव गावात सर्व शासकीय योजना राबवल्या गेल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई कायम असल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी ‘हंडा मोर्चा’ काढत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.
गावातील महिलांनी कमरेला पदर खोचून डोक्यावर हंडे घेत ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. मात्र, त्या ठिकाणी सरपंच वा कोणताही जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नसल्याने महिलांचा रोष अधिकच वाढला. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप आंदोलकांनी केला. या संदर्भात परळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनाही वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांनीही या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान, गटविकास अधिकार्यांना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधत निवेदन द्या, तुमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असा संदेश दिला. यावर समाधान न मानता खोडवा सावरगाव येथील नागरिकांनी उद्या (सोमवारी) परळी पंचायत समितीवर जाऊन गटविकास अधिकार्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.











