अंबाजोगाई (बीड) : ऑनलाईन रिपोर्टर
सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बीड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई जालना येथील एसीबी पथकाने सोमवारी दुपारी सुमारे ५ वाजता केली.
याप्रकरणातील तक्रारदार हे एका पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी व अहवाल अनुकूल देण्यासाठी आरोपी भंडारी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर २५ हजार रुपयांवर तडजोड झाली.
मात्र, लाच देण्याऐवजी तक्रारदाराने हा भ्रष्टाचार उघड करण्याचा निर्णय घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीचे उपअधीक्षक जाधवर व त्यांच्या पथकाने सोमवारी सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २५ हजार रुपये देताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तत्काळ कारवाई करत संतोष भंडारी यांना रंगेहात पकडले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी भंडारी यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.









