अंबाजोगाई (रिपोर्टर) – अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे एका 24 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश भणगे याने मंगळवारी (7 एप्रिल) दुपारी आपल्या राहत्या घराच्या छतावर जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने कुटुंबीयांनी रात्री सुमारे 8 वाजता छतावर जाऊन पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महेशचे मित्रांसोबत किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्याला बोलावण्यात आले नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर भावनिक स्टेटस ठेवले असल्याचेही समोर आले आहे.
महेश हा कुटुंबाचा आधार असून, त्याच्या व्यवसायासाठी वडिलांनी शेती विकून अंबाजोगाई येथे कपड्याचे दुकान सुरू करून दिले होते. या घटनेमुळे भणगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.












