Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातल्या नगरपंचायतींचे मुखिया कोण?

जिल्ह्यातल्या नगरपंचायतींचे मुखिया कोण?


आमदार, खासदार, मंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी नगरपंचायतींच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, पाच नगरपंचायतीतल्या २० जागांसाठी परवा मतदान; चारही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी मातब्बरांकडून रणनीती, उद्या प्रचाराची समाप्ती


आष्टी/केज/वडवणी (रिपोर्टर) मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदारांसह अन्य प्रतिष्ठीतांनी प्रतिष्ठापणाला लावलेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी नगरपंचायतींच्या उर्वरित २० जागांसाठी उद्या प्रचार संपत असल्याने आपआपल्या नगरपंचायतीत चारही जागांवर आपलेच उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रचंड व्यूहरचना आखत असून आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये आ. धस आणि आजबे रणांगणात आहेत तर केजमध्ये खा. रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. इकडे वडवणीत भाजपाचे राजाभाऊ मुंडेंविरुद्ध आ. प्रकाश सोळंके आणि त्यांच्या मदतीला धावलेले माजी आ. केशवराव आंधळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परवा १८ जानेवारी रोजी मतदान होणार असून या पाचही नगरपंचायतींसाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतलेल्या असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी या पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान झाले मात्र ओबीसी वार्डात निवडणूक आयोगाने मतदान रोखल्यामुळे त्या वार्डामध्ये १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या पाचही नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी चार उमेदवारांसाठी परवा मतदान होणार असून उद्या सायंकाळी प्रचार संपुष्टात येणार आहे. नगरपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी जिल्ह्यातील मातब्बरांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आहे. आता भाजपाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या तीनही नगरपंचायतींत मोठी ताकत लावली आहे. इकडे केज नगरपंचायतींमध्ये खा. रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत निवडणुकीमध्ये प्रचार केला आहे. खा. रजनीताई पाटील यांच्या पुत्रासह बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा निवडणूक रिंगणात असल्याने येथील निवडणूक चुरशीची होत आहे. वडवणी नगरपंचायतीसाठी भाजपाकडून राजाभाऊ मुंडे तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि माजी आ. केशवराव आंधळे यांनी ताकत लावली आहे. आरक्षणाच्या घोळामुळे दोन टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला येणार आहे. पाचही नगरपंचायतीच्या चार -चार जागांसाठी परवा मतदान होत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह आजी-माजी आमदार-खासदारांनी या निवडणुकीसाठी मोठी ताकत लावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!