बीड (रिपोर्टर): जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 21 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला (ङउइ) मोठे यश मिळाले आहे. तब्बल 35 वर्षांपासून फरार असलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
केज पोलीस ठाण्यात सन 1991 मध्ये दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात (गु.र.नं. 231/1991, कलम 395 भा.द.वि.) भागवत कमसर्या पवार (रा. कोरेगाव, ता. केज) हा आरोपी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने केज उपविभागात फरार आरोपींचा शोध सुरू असताना आरोपी आपल्या कोरेगाव येथील घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरेगाव येथे सापळा रचत आरोपी भागवत पवार याला शिताफीने ताब्यात घेतले. तपासादरम्यान सदर आरोपी हा 2017 मधील आणखी एका गुन्ह्यात (गु.र.नं. 268/2018) देखील पोलीस रेकॉर्डवर हवा असल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी केज पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार महेश जोगदंड, दिलीप गित्ते आणि चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांचा समावेश होता.









