अंबाजोगाई (रिपोर्टर)- शहरातील मांडवा रोड परिसरात एका विवाहित महिलेने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी सुनील चिकटकर हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरातील मांडवा रोडवरील शितोळे यांच्या तीन मजली इमारतीमध्ये भाड्याने राहत होते. आज सकाळी सुमारे आठ वाजता त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुनील चिकटकर (वय अंदाजे -) यांनी घरात कोणीही नसल्याची खात्री करून राहत असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
उडी घेतल्यानंतर त्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असून गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे









