केज : रिपोर्टर
केज तालुक्यात नात्यांना काळिमा फासणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील गायीच्या गोठ्यातून घरी जात असताना चुलत्यानेच एका तरुणीला अडवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही आपल्या घराच्या पाठीमागील गोठ्यातून घरी जात असताना आरोपी असलेल्या तिच्या चुलत्याने तिला अडवले. त्यानंतर तिला जबरदस्तीने खाली पाडून तिच्यावर अनैतिक अत्याचार केला. या घटनेनंतर जर कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी आरोपी व त्याच्या पत्नीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे मानसिक धक्क्यात गेलेल्या पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून सध्या संभाजीनगर येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.









