अंबाजोगाई | रिपोर्टर
लातूर–अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी सावरगावजवळ रविवारी भीषण अपघात घडून २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव शिवाई बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत अथर्व ढगे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मृत अथर्व ढगे हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.










