दिंद्रुड (रिपोर्टर) दिंद्रुड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल कोमल मारुती शिंदे या आपल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात असताना दिंद्रुड-सिरसाळा रस्त्यावर त्यांच्या कारची आणि समोरून येणार्या एका डॉक्टरच्या कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात म.पो.शि. शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा जागीच ठार झाला. तर त्यांचा चालक पो.कॉ. नवनाथ लटपटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीला धडक देणारा डॉक्टरही गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी साडे दहा वाजता घडली.
कोमल मारुती शिंदे (वय 26, रा. कावळ्याची वाडी, ता. परळी) या दिंद्रुड पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.सध्या त्या दिंद्रुड येथील पोलीस क्वॉर्टर येथे राहत होत्या. त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला सिरसाळा येथील दवाखान्यात नेण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या प्रमुख प्रभा पुंडगे यांची चारचाकी (क्र. एम.एच. 14 जी.वाय. 9113) ने पो.कॉ. नवनाथ लटपटे आणि त्या सिरसाळ्याच्या दिशेने निघाल्या होत्या. या वेळी त्यांच्या कारला डॉ. इलियास खान यांची गाडी (क्र. एम.एच. 47 5326) या गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोमल शिंदे आणि त्यांच्या मुलगा अथर्व शिंदे याचा जागीच मृत्यू झाला तर दिंद्रुड पोलीस पेट्रोल पंपाचे व्यवस्तापक गाडी चालक नवनाथ लटपटे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर समोरच्या गाडीतील डॉ. इलियास खान हे देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. डॉ. इलियास हे परळी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. हा अपघात सिरसाळा-दिंद्रुड रोडवरील प्रगती मंगल कार्यालयासमोर झाला. अपघात झाल्यानंतर जखमींना सिरसाळा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
दुर्दैवी योगायोग
दिंद्रुड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिंदे यांचे वडील हे बीड पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्यांची मुलगी कोमल शिंदे या 2012 ला त्यांच्या जागी लागल्या होत्या. त्यांचाही अपघाती मृत्यू झाल्याने हा दुर्दैवी योगायोग बीड पोलीस दलासह बीडकरांच्या मनाला चटका लावून गेला.