केज (रिपोर्टर): केज शहरातील क्रांतीनगर भागात पहिल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत दुसरे लग्न करून राहणार्या पतीने पहिल्या पत्नीवर धारदार वस्तर्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
केज येथील सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्यात चार महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर अंजना या माहेरी राहायला गेल्या होत्या. दरम्यान, सतीश लांडगे यांनी दुसर्या महिलेशी लग्न करून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती मिळताच अंजना लांडगे यांनी पतीकडे जाब विचारला. तसेच, घर बांधण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये परत मागितले. यावर संतापलेल्या सतीश लांडगे यांनी अंजनांना घराबाहेर हाकलून दिले.
एकटेपणाचा फायदा घेत क्रूर हल्ला
7 नोव्हेंबर रोजी सकाळी अंजना यांचा मुलगा व सून ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यावर गेले असताना त्या घरी एकट्या होत्या. याच वेळी सतीश लांडगे, अलका रोहीदास मुजमुले, किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले हे चौघे अंजनांच्या घरी घुसले. त्यांनी अंजनांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सतीश लांडगे यांनी धारदार वस्तर्याने त्यांच्या कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर अंजना लांडगे यांच्या तक्रारीवरून सतीश लांडगे, अलका मुजमुले, किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 515/2025 नुसार भा.दं.वि. कलम 115(2), 118(1), 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार त्रिंबक सोपने करत आहेत.










