बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील गुंडगिरी, वाळुमाफिया, हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्या गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अशा गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाया सुरू आहेत. अंबाजोगाई येथील एका खंडणीबहाद्दरावर पोलिसांनी एमपीडीए अतंर्गत कारवाई करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
मोहन दौलत मुंडे (वय 29, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) हा खंडणी मागून दहशत निर्माण करत होता. त्याच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर, केज, यासह आदी ठिकाणी खंडणी मागणे, घरफोडी करणे, दरोडा टाकणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे यासह आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी चार गुन्हे न्यायप्रवीष्ठ असून चार गुन्हे पोलिस तपासात आहेत. मुंडे हा व्यापार्यांना धमकावून त्यांच्याकडून वारंवार खंडणी घेत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र हा त्या कारवाईला न जुमानता वारंवार गुन्हे करत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. आज रोजी त्याला स्थानबद्द करून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात पाठवले. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सचिन पाडकर, डीवायएसपी स्वप्नील राठोड, स्था.गु.शाखेचे सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पो.ना. वाडकर, पो.ना. गोरे, अभिमन्यू औताडे यांनी केली.