केज (रिपोर्टर) गतवर्षी केज शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर भागातून चोरी गेलेल्या दुचाकीसह दुचाकी चोरास अंबाजोगाईच्या बस स्थानक परिसरातून केजच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. या चोरांकडून इतर चोरीला गेलेल्या दुचाकींचा ही तपास लागण्याची शक्यता आहे.
केज शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर भागातून गतवर्षी चोरी गेलेली दुचाकीसह दुचाकी चोर हा अंबाजोगाई येथील बस स्थानक परिसरात असल्याची गुप्त माहिती केजच्या डीबी पथकास मिळाली. त्यावरून 26 फेब्रुवारी रोजी केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे यांचे मार्गदर्शनाखाली केज ठाण्याचे फौजदार राजेश पाटील, डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार राम यादव, पोलीस नाईक दिलीप गीते, महादेव बहिरवाल यांच्या पथकाने अंबाजोगाई येथे जाऊन स्थानिक पोलिस कर्मचारी घोळवे, चादर यांच्या मदतीने दुचाकी चोर राहुल शरद शिंदे ( वय 21, रा. क्रांती चौक, धारूर ) यास दुचाकीसह ( एम. एच. 44 आर. 3009 ) अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राजू गुंजाळ हे करीत आहेत.
दरम्यान, केज शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून शहरातून इतर चोरीला गेलेल्या दुचाकींचा ही या पकडलेल्या दुचाकी चोराकडून चौकशीत तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.